सोलापूर - पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत कुंभारी येथे साकारलेला ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्त्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प म्हणून रे नगर चा सर्वत्र गौरव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वसाहतीतील लाभार्थ्यांना हक्काच्या घरांसोबत हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा कटिबद्ध असून किमान २५० कोटी बीज भांडवल उपलब्ध करून देण्याची हमी म्हाडा चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजीव जयस्वाल यांनी दिली. तसेच वन महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र वन विभागाने “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत २०२५ साली १० कोटी झाडे लावण्याची मोहीम राबविली असून वन महोत्सव “अमृतवृक्ष आपल्या दारी” — जनसामान्य, संस्था आणि सरकारी यंत्रणांद्वारे वृक्षसंवर्धनाला मोठ्या प्रमाणावर भाग घेण्यासाठी सक्षम करते. या उपक्रमांतर्गत रोपे, संगोपनाचे बंधन, आणि सामाजिक सहभाग या सर्वांचा समावेश आहे. जे लाभार्थी लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करतील त्यांना ५ तोळे चांदीचे नाणे पुरस्कार देण्याची घोषणा केली.
शनिवार दिनांक १९ जुलै रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण व रे नगर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव २०२५ च्या माध्यमातून कुंभारी येथे वसलेली श्रमिकांची वसाहत रे नगर येथे २१ हजार वृक्षांची लागवड , सौरऊर्जा व लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याकामी बीज भांडवल पोटी अनुदान देण्याकामी कार्यक्रमाचे आयोजन फेडरेशन चे चेअरमन कॉ.नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी रे नगर चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी मागणी केली की, "रे नगर फेडरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या घरकुल प्रकल्पात केंद्र सरकारकडील ४३.५६ कोटींची अनुदानरक्कम प्रलंबित आहे. केंद्र शासनाच्या नवीन आदेशांनुसार ही रक्कम मिळण्यास सुमारे दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे कामात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर, म्हाडाने सदर रक्कम तात्पुरती उपलब्ध करून द्यावी, आणि अनुदान प्राप्त झाल्यानंतर ती परत केली जाईल – अशी आमची स्पष्ट मागणी आहे.
राष्ट्रीयकृत बँकेद्वारे पहिल्या टप्प्यातील १२०६१ लाभार्थ्यांना २५३.८२ कोटींचे कर्ज रक्कम वितरीत करण्यात आली आहे. त्यापैकी२१४ लाभार्थ्यांनी संपूर्ण रक्कम भरली आहे, तर ४५१३ लाभार्थी नियमित गृहकर्जाचे हप्ते भरत आहेत. मात्र, ५६६७ लाभार्थी गृहकर्जाचे हप्ते अदा करण्यात दिरंगाई करत असून, त्यांच्यावर थकबाकीमुळे शासन व बँकेमार्फत फौजदारी व दिवाणी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा सर्व लाभार्थ्यांना आवाहन आहे त्यांनी वेळेवर गृहकर्जाचे थकीत हप्ते तातडीने भरून सहकार्य करावे.
दुसऱ्या टप्प्यातील घरकुल उभारणीची प्रगती उत्साहवर्धक असून, आजपर्यंत २३३६८ घरांना RCC स्लॅब पूर्ण झाले आहेत आणि २५२१० घरांना बांधकाम परवाने मंजूर झाले आहेत. उर्वरित घरांचे काम पूर्ण करण्यासाठी २५० कोटी बीज भांडवलाची गरज आहे. ही रक्कम महाराष्ट्र शासनाने त्वरीत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच माहे ऑक्टोबर पर्यंत सुमारे १५००० कुटुंबे रे नगरमध्ये वास्तव्यास येणार आहेत. या कुटुंबांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी टेलरिंग, रेडीमेड कपडे, बीडी, पापड, मेणबत्ती आदी लघुउद्योगांचे प्रोत्साहन आवश्यक आहे. हे व्यवसाय सुरू करण्यासाठी मुंबईतील दानशूर संस्थे मार्फत ५ कोटी निधी मिळण्याची शक्यता आहे.
तसेच, स्थानिक विडी कामगार, रेडीमेड उत्पादक, पापड उद्योजक आणि इतर लघुउद्योजक यांच्यासाठी माफक दरात व्यावसायिक जागा रे नगर फेडरेशनतर्फे उपलब्ध करून दिली जाईल. या पायाभूत सोयीसुविधांमुळे रोजगारनिर्मितीला गती मिळेल, आणि हजारो कुटुंबांचे जीवनमान उंचावेल."
या कार्यक्रमात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण तसेच रे नगर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, म्हाडा मुंबईचे मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य अधिकारी राहुल साकोरे, रे नगरचे मुख्य प्रवर्तक आडम मास्तर, नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर, वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी सुमित शिंदे, माजी नगरसेविका कॉ कामिनी आडम, कॉ.एम एच शेख, उद्योजक प्रल्हाद काशीद यांच्यासह म्हाडाच्या संपूर्ण वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव कॉ युसुफ शेख मेजर यांनी केले.
या प्रसंगी शहीद कुर्बान हुसेन अल्पसंख्यांक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव मुमताज शेख, कॉ.मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव विजयालक्ष्मी महेशन, अध्यक्ष यशोदा दंडी, जांबमुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कुर्मय्या म्हेत्रे, सचिव भंडारी, हुतात्मा रेडीमेड व शिलाई कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव सचिव पद्मा, अध्यक्ष संदीप रेउरे, कॉ मधुकर पंधे यंत्रमाग कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी, सचिव शंकर गड्डम, कॉ नारायणराव आडम बंद गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव मनिषा ओंकार आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या