सोलापूर : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज किल्ले श्री रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्र निजामपूर या गावाचे नामकरण रायगडवाडी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आमदार देवेंद्र कोठे व शिवभक्त गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी शनिवारी सन्मान केला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी दुर्गराज किल्ले श्री रायगडाला राजधानी बनविले. बऱ्याच काळापासून दुर्गराज किल्ले श्री रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीचे नाव बदलून छत्र निजामपूर असे करण्यात आले होते. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गराज किल्ले श्री रायगड आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाधी ज्या ग्रामपंचायत हद्दीत आहेत त्या ग्रामपंचायतीला छत्र निजामपूर असे नाव देण्यात आले होते. देशाच्या शत्रूंच्या नावाने असलेल्या गावांना पुन्हा एकदा मूळ नाव मिळावे अशी देशभरातील शिवभक्तांची गेल्या अनेक दशकांपासून मागणी होती. याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी छत्र निजामपूरचे नामकरण रायगडवाडी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे आणि मित्र परिवारातर्फे शनिवारी ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आषाढी वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष आभार आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी मानले.
याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, पवन खांडेकर, सागर भोसले, आकाश भोसले, अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, धनराज दुडम आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या