सोलापूर : आस्था रोटी बँकेने अक्षय तृतीयानिमित्त सोलापूर शहरात माणुसकीचा सुवास पसरविणारे विविध कार्यक्रम आयोजित केले. प्रारंभी भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे रामचंद्र तडवळकर, डॉ जानवी माखीजा, लक्ष्मीकांत बिराजदार यांची उपस्थिती होती.
तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खास आमरस आणि पुरणपोळीच्या मिष्टान्न भोजनाची मेजवानी उभारली गेली. रुग्णांच्या तणावग्रस्त चेहऱ्यांवर समाधानाचा हास्यफुलारा फुलला. "सणाच्या दिवशी घरापासून दूर असूनही, इथे घरचीच ऊब मिळाली," अशा भावना व्यक्त करत भावुक नातेवाईकांनी फाऊंडेशनचे आभार मानले.
या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात, कुमठा नाका रोडवरील भारतमाता नगरीत राहणाऱ्या महिला कुष्ठरोगी वर्गासाठीही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वादिष्ट मिष्टान्न भोजनानंतर, अध्यात्मिक आधार देणाऱ्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन झाले. गवळी वस्तीतले ह. भ. प. अरुंधती महाराज भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय साध्या, रोजच्या जीवनातील उदाहरणांनी स्फुर्ती देणारे कीर्तन सादर केले.
समाजाकडून दूर लोटलेल्या या महिलांना आजवर टीव्हीवरच पाहिलेल्या कीर्तनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्याची इच्छा असूनही शारीरिक व्यंगांमुळे त्यांना हे शक्य झाले नव्हते. मात्र आज, त्यांच्या गुमनाम दुनियेत आनंदाचा दीप उजळला. डोळ्यांत पाणी, ओठांवर हसू आणि मनात कृतज्ञता — असा अनोखा सोहळा या महिलांनी अनुभवला.
आस्था फाऊंडेशनने केलेल्या या उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रेमाचा, स्नेहाचा आणि आस्थेचा हात पोहचविला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय छंचुरे, नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, संपदा जोशी, अनिता तालीकोटी, राधा मॅडम, मंगल पांढरे, अविनाश मार्चला, या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले, तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले.
No comments:
Post a Comment