सोलापूर - चिंचोळी काटी येथील गायराण जमीनीतील गट क्र. १४४/१ व एम.आय.डी.सी. मधील खुल्या जागेतील लाखो ब्रास बेकायदेशीर मुरुम उपसा होत आहॆ. यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तरी येथील मुरुम उपसा बंद करण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चिंचोली एमआयडीसी परिसरातील मुरुम माफियांनी मोहोळ तालुक्यातील काही अधिकाऱ्यांशी संगणमत करुन बेसुमार मुरुम उपसा केला आहे. शासनाचा महसूल बुडवण्यामध्ये या मुरुम माफियांचा व शासकीय अधिकाऱ्यांचा हात आहॆ. या मुरुम माफियांच्या शेतजमीनींवरती बोजा चडविण्यात यावा व ज्या कंपनीमध्ये हे मुरुम वापरले जात आहे त्या कंपनींवरती कारवाई करण्यात यावी, जेणेकरुन भविष्यामध्ये अशा प्रकारचे अनाधिकृत धाडस कोणी करणार नाही. व भविष्यात सोलापूर जिल्हा देखील बीड जिल्हाप्रमाणे येथे देखील माफिया निर्माण होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी.
अशा विविध ठिकाणी आपण आपले पथक तात्काळ पाठून पंचनामा करण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष बालाजी चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनात केले आहे. लवकर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही चौगुले यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकही खडा मुरूम उपसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेश प्रशासनाला दिले होते. तरीही मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा सुरू आहे त्यामुळे आता पालकमंत्री याकडे गांभीर्याने लक्ष देणार का असा सवालही बालाजी चौगुले यांनी विचारला आहे.
यावेळी युवती सेना जिल्हा प्रमुख पूजा खंदारे, उपजिल्हा प्रमुख खंडू सलगरकर , उपजिल्हा प्रमुख रवी कांबळे, लहू गायकवाड, विकास डोलारे, शिवा माळी, ओंकार उदावत, राकेश माळकवटे, तुषार अवताडे, आदित्य भोगडे, महावीर गांधी, शुभम शिवशरण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.