ठरल तर मग : फडकणार महायुतीचाच झेंडा... पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठक

 



सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना शहर- जिल्ह्यात जोरदार कामगिरी करणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच झेंडा फडकेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची गुरुवारी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.






जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले, आगामी काळात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या सर्व निवडणुकांना शिवसेना ताकदीने सामोरी जाणार आहे. शिवसेनेला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी जिवाचे रान करून शून्यातून विश्व निर्माण करावे.







शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत आहे. त्यांचा शिवसेनेला फायदाच होणार आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढत आहे. नव्यांचा आणि जुन्यांचा सुयोग्य मेळ साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना योग्य न्याय देतील असा सर्व शिवसैनिकांना विश्वास आहे. निवडणुकांबाबत धोरणात्मक निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यांचा निर्णय सर्व शिवसैनिकांसाठी अंतिम राहील. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी महापालिका, जिल्हा परिषदा तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकाधिक जागा निवडून येतील याकरिता पक्ष बांधणी आणि पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करावेत, असेही शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.






जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शाखांच्या माध्यमातून जनतेच्या सेवेची कामे करावीत. सर्वसामान्य जनतेचा शिवसेनेवर प्रचंड विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी अधिकाधिक संपर्क आणि कार्य केल्यास शिवसेनेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निश्चितपणे प्रचंड मोठे यश मिळणार आहे, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले.






याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, शिवसेना नेते साईनाथ अभंगराव सहसंपर्कप्रमुख दादासाहेब पवार, शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, युवासेना कार्यकारणी सदस्य सुजित खुर्द, युवा सेना शहर प्रमुख समर्थ मोटे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रवीना राठोड, जयश्री पवार, अनिता गवळी, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, अश्विनी भोसले, माधुरी कांबळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा समन्वयक जवाहर जाजू, उपजिल्हाप्रमुख सागर सोलापूरे, शिवराज विभुते, समर्थ बिराजदार आदी शिवसैनिक उपस्थित होते.






बैठकीमुळे शिवसैनिकांत संचारली ऊर्जा

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीमुळे शिवसैनिकांत ऊर्जा संचारल्याचे दिसले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यरत राहण्याचे सामूहिकपणे वचन शिवसैनिकांनी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत आणि पदाधिकाऱ्यांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या