सोलापूर : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने क्रांतीप्रवण झालेल्या सोलापूर नगरीत शनिवार दि. 3 मे 2025 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिरात( लुम्बीनी नगरीत) राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भंते यश यांची धम्मदेसना, डॉ. भीमराव आंबेडकर यांचे मार्गदर्शन आणि विविध परिसंवादातून धम्म विचारांचा जागर होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बौद्ध साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वाजता श्रीलंकेचे भंते यश यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भंते यश यांची धम्मदेसना होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी शिक्षणाधिकारी योगीराज वाघमारे हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.यावेळी संमेलनाचे अध्यक्ष वाघमारे यांचे अध्यक्षीय भाषण होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव , पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे , जि.प.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जि.प.सोलापूर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख , कुर्डूवाडी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सतपाल आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
दुपारी 1 वाजता पहिल्या परिसंवादात " धर्मांतरोत्तर सामाजिक पुनर्बांधणीसाठी आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्यिकांची भूमिका कितपत पोषक " या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. आनंद देवडेकर (मुंबई ) तर प्रा.डॉ. सारीपुत्र तुपेरे (सोलापूर) प्रा. डॉ. एम. डी. शिंदे (सोलापूर) या वक्त्यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 2 ते 2.30 दरम्यान सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
दुपारी 2.30 वाजता दुसरा परिसंवाद होणार असून यामध्ये "बौद्ध धम्माची आधुनिक काळात गरज"या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजय मोहिते हे विचार मांडणार आहेत. यामध्ये प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे (सोलापूर), उपप्राचार्य प्रकाश शिंदे या मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.
दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या तिसऱ्या परिसंवादात "मराठी भाषेत बौद्ध साहित्य निर्मिती- काल - आज - उद्या " या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड (सोलापूर) तर साहित्यिक प्रा. डॉ. धम्मपाल माशाळकर (सोलापूर), पत्रकार, लेखक दत्ता थोरे हे विचार मांडतील.
सायंकाळी 4.30 वाजता "धम्म चळवळीत महिलांचे योगदान "या विषयावर चौथा परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्रमुख वक्त्या प्रा. रेखा मेश्राम (छत्रपती संभाजीनगर) , प्रा. डॉ. अंजना गायकवाड(सोलापूर), प्रा. अहिल्या गायकवाड-कांबळे (सोलापूर), शारदा गजभिये (सोलापूर), धम्मरक्षिता कांबळे (सोलापूर) या विचार मांडणार आहेत.
दरम्यान, सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या पाचव्या परिसंवादात " पाली भाषेतील बौद्ध साहित्य " या विषयावर प्रमुख वक्ते तथा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पाली भाषा विभाग प्रमुख प्रा.डॉ.विजयकुमार झुंबरे आणि डॉ. औदुंबर मस्के (सोलापूर), प्रा. डॉ. देविदास गायकवाड(सोलापूर), डॉ. सुभाष कांबळे (सोलापूर) आदी विचार मांडणार आहेत.
सायंकाळी 7 वाजता समारोप सत्रात प्रमुख अतिथी म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर (मुंबई )हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी रिपाइं(ए) चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री राजाभाऊ सरवदे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे , ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे , भीमशक्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुबोध वाघमोडे, रिपाइंचे ज्येष्ठ नेतेे के. डी. कांबळे, बसपाचे प्रदेश महासचिव अॅड. संजीव सदाफुले , कामगार नेते अशोक जानराव, कामगार नेते जनार्दन शिंदे, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध वाघमारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संमेलनास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस कोषाध्यक्ष किरण बनसोडे , समन्वयक डॉ. सुरेश कोरे , कार्यवाह भालचंद्र साखरे, प्रा. वशिष्ठ सोनकांबळे , अण्णासाहेब वाघमारे आदींसह कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
' मोहब्बत की किताब' नाटिकेद्वारे संविधान जागर !
दरम्यान, सायंकाळी 6.30 वाजता प्रबोधनात्मक नाटिका ' मोहब्बत की किताब' नाटिकेद्वारे संविधान जागर होणार आहे.राज्यकर निरीक्षक अभियंता बुद्धजय भालशंकर लिखित आणि भागवत कुवळेकर दिग्दर्शित या भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करणार्या लघु नाटिकेचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बुद्धजय भालशंकर, भागवत कुवळेकर, शशिकांत जाधव, सविता कुवळेकर यांची प्रमुख भूमिका राहणार आहे,असे समन्वयक डॉ. सुरेश कोरे यांनी सांगितले.
संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये -
* संमेलन विचार मंचाला "सारनाथ" तर ग्रंथदालनास "नालंदा" नाव
* एकूण 5 परिसंवाद तर एका लघुनाटिकेचा समावेश
* विविध महत्त्वपूर्ण विषयांवर
होणार ठराव मंजूर
* शाक्य संस्था, सिदनाक ब्रिगेड व समता सैनिक दल या तिन्ही दलाची एकसंघ सलामी * स्फूर्तीदायी गीतांचा कार्यक्रम