सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाचा बुधवारी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ होणार आहे. यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड (नॅफकॅब) चे उपाध्यक्ष सी.ए. मिलिंद काळे, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी याप्रसंगी केले.
बँकेच्या हीरक महोत्सवानिमित्त वर्षभर सर्व शाखांच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मेळावे, काही शाखांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन, व्याख्याने, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, बँकांच्या संचालकांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा, परिसंवाद तसेच विद्यार्थ्यांसाठी माहितीपर व्याख्याने, माजी कर्मचारी आणि माजी संचालक यांचे एकत्रिकरण असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त बँकेच्या नवी पेठ शाखेत बुधवारी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या पूजेच्या तीर्थप्रसादासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर जनता बँकेतर्फे करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे, संचालक ॲड. प्रदीपसिंह राजपूत, तज्ञ संचालक सी. ए. गिरीष बोरगावकर, जगदीश भुतडा, मुकुंद कुलकर्णी, विनोद कुचेरिया, संचालिका चंद्रिका चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, मकरंद जोशी, देवदत्त पटवर्धन, सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीदास गज्जम, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापूरकर, मल्लिनाथ खुने, सुधांशू रानडे, मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment