सोलापूर : सोलापुरात पक्ष्यांसाठी *शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी चार हुतात्मा पुतळा चौक येथे सकाळी सात वाजल्यापासून पक्षांना पाणी ठेवण्यासाठी शहरवासीयांना एक हजार जलपात्र मोफत वाटली जाणार आहेत*. सोलापुरातील लिटल फ्लावर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या १९८८ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अनोखा असा हा पक्ष्यांसाठी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. अहमदाबाद मधील अंकुर इंडस्ट्रीज च्या पुढाकाराने सोलापूरकरांना ही पक्षांसाठी मातीची भांडी दिली जाणार असल्याची माहिती जितेंद्र व्होरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर जिल्ह्यात महाकाय असे उजनी धरण आहे. या ठिकाणी हजारो पक्षी शेकडो मैल प्रवास करून येतात. सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच होटगी तलाव या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळतात. सोलापूरच्या आजूबाजूचे वातावरण पक्षांसाठी पोषक असल्यामुळे पक्षांचे सोलापूर हे माहेरघर आहे.
लोकांमध्ये पक्षांविषयी प्रेम जागृत व्हावे, पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पाणपोई हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरचे तापमान उन्हाळ्यामध्ये सरासरी ४० अंशाच्या वरच राहते. त्यामुळे पक्षांना पाणी शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आपल्या घराभोवती, गॅलरीमध्ये तसेच बागेत नैसर्गिक चिवचिवाट वाढावा, म्हणून पक्षांसाठी सर्वांनी पाणी ठेवावे म्हणून खास अहमदाबाद मध्ये बनवलेली ही मातीची भांडी शहरवासीयांना दिली जाणार आहेत. एकूण ५००० जलपात्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शनिवारी यातील एक हजार जलपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी सात वाजता या उपक्रमाचा शुभारंभ सोलापुरातील लोकप्रतिनिधी, तसेच विविध शासकीय अधिकारी आणि उद्योजक यांच्या हस्ते केला जाणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, खासदार प्रणिती शिंदे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत निमंत्रण देण्यात आले आहे.
त्यामुळे शहरवासीयांनी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून चार पुतळ्याजवळ येऊन पक्षांसाठीची ही जलपात्रे घेऊन जावीत. तसेच या भांड्यामध्ये पाणी पिताणाचे पक्षांचे फोटो आम्हाला पाठवावेत त्यातील उत्कृष्ट अशा तीन छायाचित्रांना आम्ही बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करु, अशी माहिती जितेंद्र व्होरा यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस द्वारका उपलप तसेच रमेश रापेल्ली हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment