सोलापूर - संकटात सापडलेल्या मुलांच्या मदतीसाठी 1098 ही चाईल्ड हेल्पलाईन सर्व दिवस चोवीस तास सुरू आहे. कुठेही बालक संकटात असल्याचे जाणवताच नागरिकांनी हेल्पलाईनचा वापर करून त्याला मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडबली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात असलेबाबतच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच सदर संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झालेबाबत निदर्शनास येत आहे. ही बाब हि अत्यंत गंभीर स्वरूपाची असून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहेत.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला 1 वर्षे कारावास तसेच रुपये 1 लाखांपेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल अशी तरतूद नमूद करण्यात आलेली आहे.
नागरिकांनी आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 या वर संपर्क साधुन बालकांवरील शारिरीक तसेच लैंगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही महिला व बाल विकास आयुक्त, नयना गुंडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment