सोलापूर : ज्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरून देशभरात प्रचंड चर्चा सुरू आहे, तो वक्फ शब्दच भारतीय संविधानात कुठेही लिहिलेला नाही असे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले. विकास सहकारी बँकेतर्फे रविवारी सकाळी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात 'महान भारत' या विषयावर त्यांचे अभ्यासू व्याख्यान झाले.
प्रारंभी ॲड. अश्विनी उपाध्याय यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर बँकेचे चेअरमन कमलकिशोर राठी, बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सी.ए. राजगोपाल मिणियार, व्हा. चेअरमन राजगोपाल चंडक, जनरल मॅनेजर सी. ए पी. एस. मंत्री उपस्थित होते.
ॲड. उपाध्याय म्हणाले, अयोध्या, काशी, मथुरा, संभल अशा अनेक प्रकरणात कागद मागणारे सर्वोच्च न्यायालय वक्फ प्रकरणात मात्र कागद कोठून आणणार असे म्हणत आहे. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत. परंतु हिंदूंसोबत भेदभाव होत आहे. भारत हा जगात एकमेव देश असा आहे की जिथे बहुसंख्य लोक सर्वधर्मीयांना समान अधिकार द्या असे म्हणत आहेत. भारतातील चार लाख मठ आणि मंदिरांवर सरकारचे नियंत्रण आहे. परंतु एकाही मशीद आणि चर्चवर सरकारी नियंत्रण नाही, असेही ॲड. उपाध्याय यांनी सांगितले.
७०० वर्षांच्या मोगलांच्या आणि १५० वर्षे इंग्रजांच्या गुलामीनंतर वक्फची ५० हजार एकर जमीन होती. परंतु स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये यात तब्बल ८० पट वाढ होऊन ती ४० लाख एकर झाली. याला आक्षेप असल्याचे ॲड. उपाध्याय म्हणाले. वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यासाठी संयुक्त संसदीय समिती, चर्चा मतदान ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर हा कायदा बनला आहे. मग या कायद्याला विरोध का होत आहे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लोकसंख्येचा विस्फोट हे भारतातील ५० टक्के समस्यांचे मूळ कारण आहे. जगाच्या तुलनेत भारताकडे दोन टक्के जमीन आहे. त्यानुसार भारताची लोकसंख्या १६ कोटी हवी. परंतु भारताची लोकसंख्या १५० कोटींच्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्यविषयक समस्या, प्रदूषण वाढत आहे. भारतात या समस्यांवर चर्चा केली जाते. परंतु त्यावरील उपायांबाबत चर्चा आणि कृती होत नाही असेही ॲड. अश्विनी उपाध्याय यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी संचालक डॉ. नवनीत तोष्णीवाल, ओमप्रकाश तिवाडी, सुरेश बिटला, राजकुमार राठी, हरिनिवास जाजू ,मनीष बलदवा, सुरेश बिटला , राजेंद्र आसावा, ज्योती आसावा आधी उपस्थित होते.
बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सी.ए. राजगोपाल मिणियार यांनी प्रास्ताविक केले. संचालिका अनुराधा चांडक यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
No comments:
Post a Comment