सोलापूर - कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता विभाग, महाराष्ट्राचे मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात कौशल्यविकास क्षेत्रात सहयोग करण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे संलग्न महाविद्यालयांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल.
या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील, जे त्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारसंधी वाढवतील. हे प्रशिक्षण उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक रोजगार साठी उत्तम संधी मिळतील.
या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे उपस्थित होते. या करारावर कुलसचिव योगिनी घारे आणि कौशल्य विकास मंत्रालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाचे सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे हे उपस्थित होते. यावेळी कौशल्य विकास विभाग संचालक प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, कायदा अधिकारी ॲड. जावेद खैरदी, अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर, डॉ. वीरभद्र दंडे, उद्यम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुराणी, मयंक चौहान, कौशल विकास सोसायटीचे दत्तात्रय देवळे, मिलिंद अहेर, मोहसीन तांबोळी यांची उपस्थिती होती. हा करार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे आनंद मापुस्कर आणि संदीप पिसके यांचे सहकार्य लाभले.
हा करार विद्यार्थ्यांना उद्योगस्नेही कौशल्ये प्रदान करून त्यांना सक्षम बनवण्यास मदत करेल. त्यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीसही चालना मिळेल, असे कुलगुरू प्रा. डॉ. महानवर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment