सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील प्रलंबित विकास कामे आणि नागरी सुविधांबाबत मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या समवेत प्रदीर्घ चर्चा केली. याप्रसंगी शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांमध्ये घरकुल योजना राबवण्यासाठीचा आराखडा बनविणे, दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करून चाचणी घेणे, धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण तसेच प्राणी संग्रहालय पुनर्निर्मितीची आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील शौचालय पाडून परिसर विकास करावा अशी आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी घेतली.
सोलापूर ते उजनी दरम्यान सुरू असलेल्या दुहेरी जलवाहिनीचे काम केवळ ४०० मीटर अपूर्ण राहिले आहे. हे काम पूर्ण करून येत्या आठवड्यातच या जलवाहिनीची चाचणी घेण्याबाबतच्या सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्या. धर्मवीर संभाजी तलाव पर्यटन विकासाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी आराखडा करण्यात यावा, महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची पुनर्निर्मिती करण्याकरीता सोलापूर महानगरपालिका स्तरावरून प्रयत्न व्हावेत. याकरिता राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.
शहर मध्य मतदारसंघात शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्याच्या जागेवर घरकुल योजना राबवण्यासाठी आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सर्वेक्षण करून आराखडा बनविण्याबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आली.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोर असलेले शौचालय पाडून त्या परिसराचा विकास करावा, अशी आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याशी चर्चा करताना घेतली. त्यामुळे अनेक वर्षांपासून श्री सिद्धरामेश्वर भक्तांची मागणी लवकरच पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय स्मार्ट सिटीमधील ॲडव्हेंचर पार्कसह इतर विविध कामांची देखभाल दुरुस्ती व्हावी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले. शहरातील स्वच्छतेची योग्य निगा राखण्यासाठी रात्री रस्ते आणि शहर परिसर स्वच्छ करण्याची यंत्रणा पुन्हा सुरू करावी, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील बहुचर्चित मार्कंडेय जलतरण तलावातील समस्यांबाबतही आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मार्कंडेय जलतरण तलाव विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर खुला व्हावा, जलतरणपटूंना स्पर्धांची तयारी करण्यासाठी आवश्यक सुविधा येथे उपलब्ध करून द्याव्यात तसेच जलतरण तलावाचा मक्ता दिलेल्या मक्तेदाराला संपूर्ण वर्षभर तलाव सुरू ठेवण्याच्या सक्त सूचना द्याव्यात असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.
या बैठकीप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागेश खरात, अक्षय वाकसे, संजीव कांबळे, अंबादास सकिनाल, पवन खांडेकर, दिनेश जाधव, अमर शिंदे आदी उपस्थित होते.
तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त रवी पवार, आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, मठपती, गोकुळ चितारे व शर्मिष्ठा सल्ला यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment