आयटी पार्क, पूर्वभागात नवे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, ६० मीटर डीपी रोडसह शहर विकासाच्या १३ कामांच्या पूर्ततेची मागणी

 



सोलापूर -  सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावे, शासनाचे नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्वभागात सुरू करावे यासह शहर विकासाच्या १३ कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूर करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत दिले.





बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची विकासकामांबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील बुद्धिमान तरुण शहराबाहेर जाणे रोखण्याकरिता उद्योजकांच्या मदतीने सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावे, पूर्वभागात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी शासनाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करावे, सोलापूर शहरातील भटक्या विमुक्त जातींसाठी ४० हजार घरकुलांची योजना मंजूर करावी, मुंबई आणि तिरुपतीसाठी विमान सेवा सुरू व्हावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या ८५० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश काढण्यात यावा, १०० ई बस सुरू कराव्यात, सोलापूर शहराच्या विकासासाठी बी टू रद्द करावा, सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावे, शासनाच्या मनपाच्या आणि खाजगी मालकांच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी योजना मंजूर करावी आदी मागण्या मांडत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर विकासाच्या दृष्टीने चर्चा केली.





त्याचबरोबर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या परिसराचा विकास करावा, ४ लाखांहून अधिक लोक निगडित असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी जुन्या मशिनरी अपग्रेड करण्यासाठी सबसिडी, वीज सवलत व सोलर सबसिडी, विशेष पॅकेज उपलब्ध करून द्यावे, पुणे, हैदराबाद, विजयपूर, अक्कलकोट, होटगी या गावांच्या रस्त्यांना जोडणारे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील ६० मीटर अंतर्गत रिंगरोड व्हावा, आजूबाजूच्या ४ राज्यांमध्ये एकमेव असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असलेला २० कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा, धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणासाठी तयार असलेल्या ६० कोटी रुपयांच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजूरी मिळावी या मागण्याही याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी केल्या. 





आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत तत्वतः मंजुरी दिली. या बैठकीस सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य उपस्थित होते. 





सोलापूरचा विकास आता थांबणार नाही 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासाकरिता जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केलेला आहे. सोलापूर शहराच्या विकासाकरिता विधानसभा सदस्य या नात्याने मी केलेल्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित मंजुरी दिल्याबद्दल सोलापुरातील सर्व नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार ! सोलापूरचा विकास आता थांबणार नाही. 

-- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या